Friday, August 12, 2022

म्हणे स्वातंञ्याचा अमृतमहोत्सव

वाचायलाच हवे.......
               म्हणे स्वातंञ्याचा अमृतमहोत्सव
सध्या आपल्या अखंड हिंदुस्थानात स्वतंञ भारताच्या अमृत महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच 'हर घर तिरंगाचा' नारा लगावत आहे. लहानांची तर लगबग वेगळीच. उद्यापासून सुरु होणाऱ्या तीन दिवसीय झेंडावंदन सोहळ्यासाठी दररोज प्रभातफेरीतून गावागावांत जनजागृती त्यांच्या शाळेद्वारे करून घेतली जात आहे. 'हर घर तिरंगा, घर घर तिरंगा' ! हा नारा म्हणजे हरीनामच त्यांच्यासाठी.

आज‌ माझ्यासमोर एक असा प्रसंग घडला, ज्याने काही क्षण चक्रावल्यासारंखच झालं. माझी बहिण आणि तिच्या मैञिणी उद्यापासून त्या किती व्यस्त असणार आहेत याबाबत गप्पा मारत बसल्या होत्या. लहानच त्या. त्यामुळे स्वातंञ्यदिनाचा उत्साह त्यांच्यात चांगलाच संचारलेला दिसला. 
थोडा हस्तक्षेप करत मी त्यांना अगदी सहज एक प्रश्न विचारला, कसली एवढी तयारी चालू आहे गं? 
अगं ताई, १५ ऑगस्ट नाही का. 
मग मी म्हटलं हो, पण १५ ऑगस्ट केव्हा आहे? 
काय‌ गं ताई, सोमवारी नाही का १५ ऑगस्ट. 
मला जरा हसूच आले. मग परत एकदा मी‌ म्हंटलं, हो पण बेटा १५ ऑगस्टला काय आहे? 
त्यांचं पुढचं उत्तर जास्त महत्वाचं. 
ताई १५ ऑगस्टला झेंडा वंदन आहे आणि आमची पीटी‌ आहे.
हो पण झेंडा वंदन शाळेत का आहे ? 
कारण १५ ऑगस्ट आहे. 
क्षणभर‌ मी स्तब्ध.... डोळे माञ विस्फारले. ज्या स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे, संपुर्ण राष्ट्रात देशभक्तीचे वातावरण आहे, त्याच देशातील लहान शालेय पिढीला १५ ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्यदिन असतो हेच माहित नाही. आपण जे राष्ट्रगीत म्हणतो त्याचा नेमका अर्थ माहित नाही. भारत स्वतंत्र कधी स्वतंञ झाला होता? हेच त्यांना माहित‌ नाही. भारतीय स्वातंत्र्यदिनाचा इतिहास त्या चिमुकल्यांसाठी अस्तित्वातच नाही ये. काय म्हणावं अन् काय बोलावं अशी गत झाली आहे.

 कालच माझी मैत्रीण रसिका सदावर्ते हिने एक सुंदर लेख लिहिला, जर मी माझ्या डीपीवर तिरंगा लावला नाही तर मला देशद्रोही समजले जाईल का? माझी देशभक्ती त्या डीपीतूनच मोजली जाईल का? तिरंग्या बाबतीतली सत्यपरिस्थिती तिने मांडली. 'देश का हर बच्चा- बच्चा लहराएंगा तिरंगा' ! पण तो तिरंगा त्यांच्या हातात देण्याआधी त्या तिरंग्याची पार्श्वभूमी, स्वतंञ भारताचा इतिहास त्यांना समजवा. आज भारत स्वतंञ होऊन ७५ वर्षे उलटली. त्या पंच्चाहत्तरीचा प्रवास, आपल्या प्राणाची आहुती देणारे हुतात्मे कोण? यांचा इतिहास आधी जागता करा. तेव्हाच स्वातंञ्याचा अमृतमहोत्सव साजरा होईल. नाहीतर काय; समोर विद्यार्थी देताय घोषणा. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो! हर घर तिरंगा, घर घर तिरंगा! वंदे मातरम्! पण तो नुसता सोपोस्कार असेल. मग रसिकाच्या म्हणण्याप्रमाणे तो तिरंगा झेंडा वंदनानंतर असेल कुठल्यातरी गटारीत किंवा रस्त्याच्या कडेला. मग नाही म्हणायचं, अपमान झाला तिरंग्याचा. कारण आपणच त्यांना तिरंग्याचा इतिहास नाही सांगितला तर त्याची इज्जत करतात हे त्यांना कसं कळणार? ही परिस्थिती आहे सरकारी शाळांची. तेथील विद्यार्थ्यांना कसे शिक्षणाचे धडे मिळत असतील हे या प्रसंगावरून आपण अनुमान लावू शकता. तर मुद्दा हा आहे की, आदरणीय शिक्षक आणि पालक, एकदा तुमच्या मुलांना विचारा. भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणजे काय? अन् नसेल‌ येत तर त्यांना आधी आपल्या देशाची ओळख करुन द्या अन् मगच स्वातंञ्यदिनासोबत तीन दिवसांचा अमृतमहोत्सव साजरा करा. 

आपल्या भारतीय ज्ञानकोषात एवढं साहित्य आहे, अनेक विचारवंत आहेत, इंटरनेटसारखा गुरु आहे, अनेक चिञपट आहेत आणि त्याहूनही जास्त तुम्ही स्वत: त्या चिमुकल्यांचे गुरु आहात, जे त्यांना हे बाळकडू पाजू शकतात. माञ पाठ्यपुस्तकं शिकवण्याच्या तंद्रीत देशाच्या ऐतिहासिक ग्रंथापासूनच ती मुले अनभिज्ञ आहेत. त्यांना याबाबतीत साक्षर करण्याची पालक आणि शिक्षकांची नैतिक जबाबदारी आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वातंञ्याची पंच्चाहत्तरी अमृतमहोत्सवी ठरेल, जेव्हा आजची पिढी तो इतिहासाचा ठेवा समजेल आणि जपेल.
जरा विचार करा अन् पटलं तर‌ जास्तीत लोकांपर्यंत ही पोस्ट पाठवा जेणेकरुन भारतीय स्वातंञ्यदिनापुर्वीतरी या पिढीला स्वतंञ‌ भारताचा थोडातरी इतिहास माहित करुन देण्यासाठी एखादं पाऊल तरी सरसावेल....!
                           🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

6 comments:

  1. सुंदर लेख ✒️✒️👌👌

    ReplyDelete
  2. निश्चितच विचार करायला लावणारा लेख

    ReplyDelete
  3. वास्तव परिस्थिती आहे हि आज देशाची, या गोष्टीला आपण नाकारु शकत नाहीत, देशभक्ती, देशप्रेम, महापुरुषांचे विचार डोक्यात घेण्यापेक्षा डोक्यावर घेत आहेत सर्व. वास्तव परिस्थितीपासुन लोकांचे लक्ष दुर करण्यासाठी राजकीय लोक हे असे राष्ट्रभक्तीचे भुत नागरिकांच्या डोक्यात शिरवतात

    ReplyDelete
  4. मोजक्या शब्दात खुप मोठा धडा दिलाय प्राची एकीकडे आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक उपक्रम बघतोय मी तर अक्षरशः कंटाळलोय ते कव्हर करुन पण नुसते उपक्रम घेऊन काय फायदा? जो तिरंगा आपल्याला फडकवायचा आहे त्याचा इतिहास, महत्वच जर माहिती नसेल तर‌ तो फडकावून काय फायदा...

    ReplyDelete

बदलत्या वाचनसंस्कृतीकडे पाहतांना

       📚बदलत्या वाचनसंस्कृतीकडे पाहतांना📚 आधुनिक जगाच्या आधुनिक युगात व स्वातंञ्यापुर्वीच्या पारतंञ्यात परिस्थिती बदलाचे वार...