Thursday, August 11, 2022

🤝कळावे असे बंधन 🤝

कालपासून नुसती डोळ्यापुढे राखी आणि डोक्यात विचार  हेच चक्र माझ्या अवतीभोवती फिरतंय.  पण नेमकं काय माझ्या लेखणीला उतरवायचं आहे हे मलाही उमजेना. कदाचित काहीतरी वेगळंच ती मला खुणावतेय. बालपण? शहाणपण? की असंख्य आठवणींचा संच? माहित नाही काय पण अनेक प्रसंग डोळ्यासमोरून पुसटसे जातांना दिसता तर आहेत, बघूयात येतात का ते मला गाठता.

 राखी पोर्णिमा हा भावा बहिणीच्या रेशमी बंधाचा सण तर कोकणात समुद्र या अन्नदात्याला त्याने केलेल्या उपकारासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. चाळायला गेलं तर याच राखीच्या बंधनाचे अनेक रुपं विविधतेतील भारतात आपल्याला आढळतील. पोर्णिमा ही दर महिन्याला येते, माञ राखीला येणारी पोर्णिमा जणू त्या आकाशातील चंद्रालाच राखीच्या बंधनातून बांधायला येते म्हणूनच तो चंद्र त्यादिवशी  दैदिप्यमान प्रकाशमान होऊन आकाशवारी करत असतो. राखी पोर्णिमा, बहिण-भावाचे नाते, राखी पोर्णिमेचे महत्व या सर्व गोष्टी आपल्याला मुखपाठ आहेत. पण खरच आपल्याला राखी कळलीय का हो? तुम्हालाच नाही अगदी मलाही तो इवलासा धागा कधी उलगडलाय का? हा प्रश्न एकदा कधीतरी स्वत:ला विचारावा. का तर...? हा प्रश्न मला पडण्यामागे सभोवताली घडलेल्या प्रसंगाचा हा परिणाम असावा. म्हणून खरतर आजच्याच दिवसाचा मुहूर्त साधून हा लेख....

काल आत्याचा फोन आला अन् ती म्हणते मला आम्हा भावंडांचा एक फोटो हवा आहे तयार करुन देशील का? तेव्हा असं झालं अरेच्छा! एवढ्या वर्षांत अनेक सण समारंभ प्रसंगांना आपण एकञ आलोत पण आपल्या आत्या, काका, बाबा या भावंडांचा एकञ असा एकही फोटो नाही. जरा वाईट वाटलं. पण एक वेगळीच राखीपोर्णिमा डोळ्यासमोर‌ अवतरली. त्यांनी कधी सोबत फोटो काढला नाही, कधीच एकमेंकांवरचं प्रेमही व्यक्त केलं नाही माञ तरी त्यांच्यातील नातं हे आजच्या पिढीपेक्षाही  अतुट वाटतं.  अजूनही पोस्टमास्तर त्यांची राखी पोहोचवतो. त्यातील ते पञ म्हणजे अव्यक्त भावनांनी शब्दांतून मांडलेला सागरच जणू. नकळतपणे बाबा काकांना ती गोष्ट जाणवते. जरी ते व्यक्त होत नसले तरी त्यांनी फोटोत नाही तर‌ मनाच्याच कॅमेरात त्यांची प्रत्येक राखी कैद‌ करुन ठेवली आहे, हे ते पञ वाचल्यावर ध्यानात येते. आता तर व्हॉट्सॲप वर "Happy Rakshabandhan" टाकले की, जवळच्या भावंडांना काय अगदी विदेशातही शुभेच्छा पोहोचतात. माञ त्या पञातून मिळणारा मनाचा विसावा आणि विसाव्यातून निर्माण होणारा ओलावा त्यात‌ जाणवत नाही. 

आजकाल‌ राजकारणातील राखी म्हणजे सगळ्यात मोठी पोर्णिमा. असे साधारण चिञ दिसते. राखीवरुनही राजकारणाची गणितं मांडता येतात ही समज यायला खुप उशीरच लागला. एक नातं असतं ते मानलेल्या बहिण भावाचं. ते‌ ना रक्ताचं असतं ना धर्माचं ना कुठल्याच जातीचं ते असतं फक्त अन् फक्त आपुलकीचं, कर्तव्याचं आणि प्रेमाचं. पुर्वीपासून या अशा नात्याचे संस्कार आपल्याला घरात रुजलेले दिसतात. मी ते प्रत्यक्ष बघते ते म्हणजे माझे बाबा आणि सुलोचना आत्यामध्ये. खरतर अतिशय अप्रुप वाटतं मला. ज्या निस्वार्थ भावनेतून ती आम्हाला जीव लावते त्याच निस्वार्थ भावनेतून बाबाही ते नातं जपतात आणि सर्वात आधी तिची राखी बांधतात.‌ त्या राखीच्या बंधाला नाहीच सर कशाची.

शाळा अन् कॉलेजच्या वातावरणात खुप तफावत असते ती अशी की शाळेत असतांना बालवयातील विचारांची एक वेगळी पकड आपल्यावर‌ असते हळुहळू आपल्या त्याच विचारांना वातावरणाची जोड मिळून प्रगल्भता वाढत जाते‌‌. मला शाळेतली राखी खुप स्पष्ट आठवते. खरतर ते आठवून खुद्कन हसायलाही येते अन् मन लाजिरवाणंही होतं. राखी पोर्णिमा म्हटलं की मुलींमध्ये भारी उत्साह कारण त्यावेळच्या त्यांच्या नजरेतून जी मुलं. त्यांच्यावर लाईन मारत असायचे त्यांना गाठून आधी त्यांना राखी बांधायची अन् ती बांधल्यावर त्या  मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद असा ओसंडून वाहत असायचा. खरतर असं‌ काही नसतं पण शेवटी ते बालमनच ना. आजुबाजूच्या प्रसंगांचा उमटलेला तो परिणाम असायचा. पण ती गंम्मतच वेगळी असायची. कारण काही मुलं राखी बांधावी लागेल म्हणून यायची नाहीत तर काही माञ सगळ्यांना चॉकलेट्स किंवा त्याच्याजवळ असतील ते पैसे देवून राखी बांधून घेत असत. खुप मजेशीर बंध होता तो. 

शिक्षणानिमित्त बाहेर राहण्याचा योग आला. शाळेपलीकडचं एक वेगळच विश्व अन् त्या विश्वात सोबतीचा पहिला हात मिळतो तो  मैञीचा. तिथे माञ बंधनं नसतात स्वच्छंदी जगण्याला आणि निखळ मैञीला. मग तो मुलगा असो की मुलगी. मैञी नितळ असते. पण या नात्यात मुलं आणि प्रामुख्याने मुली. कारण मी जवळून त्या गोष्टी बघितल्यात म्हणून मुलींवर  जास्त जोर देवून बोलतेय. आपल्या मिञासोबत बाहेर‌ फिरायला जातात अन् हॉस्टेलच्या आवारात येवून गेटबाहेर‌ तासनतास गप्पा मारत बसतात. यात काहीही गैर नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करतेय माञ जेव्हा  वेळ उलटून गेल्यावर गेटवरील वॉचमन काका आवाज देतात. तेव्हा मुलींना विचारले असता त्या उत्तरतात, हा माझा भाऊ आहे. मामाची बाजू मला योग्य वाटली कोणता भाऊ रोज आपल्या बहिणीला सोडायला हॉस्टेलला येतो? कोणती बहिण आपल्या भावाशी कोपऱ्यात जाऊन बोलते किंवा कोणता भाऊ हॉस्टेलची गेट बंद होण्याची वेळ संपल्यावरही आपल्या बहिणीला आत सोडत नाही? हॉस्टेलचे नियम हे मुलींसाठीच असतात ना. पण अशापध्दतीने‌ भाऊ नावाच्या जिव्हाळ्याच्या आणि त्याहूनही जास्त सुरक्षेच्या नात्याला गालबोट लावणं, त्याचा असा वापर करणं एक बहिण म्हणून आपल्याला कितपत योग्य वाटतं‌ हा प्रश्न एकदा स्वत:च्या मनाला विचारुन बघावा. आपल्या आयुष्यात मिञ हे नातंही तेवढंच महत्वाचं असतं‌ ना. मग जेवढं‌ बिनधास्तपणे तुम्ही त्याच्यासोबत‌ असता तसंच जर तुम्ही सांगितलं तर बिघडणार काय आहे. या गोष्टीमुळे खऱ्या भाऊबहिणीच्या नात्यातील आर्द्रता माञ शुष्क होत चालली आहे. आपण कोणासोबत असावे हा व्यक्तीस्वातंञ्याचा विषय असतो.‌ पण जेव्हा तुम्ही एका विशिष्ट ठिकाणी वास्तव्यास असता तेव्हा गेटच्या आतमध्ये तुमची जवाबदारी ही त्यांची असते. तर त्यावेळी आपल्याला मिळालेल्या स्वातंञ्याचा असा दुरुपयोग न करता तिथल्या शिस्तीचे पालन करणे आपले कर्तव्य असते. तर मिळालेल्या संधीचा आणि पवित्र अशा नात्याचा असा वापर‌ कुणी करु नये असे माझे प्रांजळ मत‌ आहे. मिञ आहे तर‌ हो आहे मिञ. त्यात काही गैर‌ वाटण्याचं कारण नाही. आपला दृष्टीकोन पारदर्शक आणि विचारांमध्ये प्रगल्भता असली की, कोण काय विचार करतं हे मुळी ग्राह्य नसावंच. आपण काहीही चुकीचं वागत नाही याचा आत्मविश्वास ठेवून वाट चालावी. 

आणखी एका मुद्यावर प्रकाश टाकावा तो असा की, विद्यापीठासारख्या ठिकाणी पोलीस अनेक तरुण तरुणींना पकडत असतात. तिथेही पोलिसांना पाहून घाबरत हा माझा भाऊ आहे सरळ सांगून मोकळ्या होतात. म्हणजे का? तुम्ही काही चुकीचं‌ वागत नाही आहात तर स्पष्टपणे आपली बाजू मांडतांना जीभ कशी कचरते. ते पोलीस आहेत चौकशी करणं त्याचं काम; पण जर‌ तुम्ही घाबरलेल्या अवस्थेत असाल तर नक्कीच त्यातील‌ काही संधीसाधू पोलीस कर्मचारी तुम्हाला भय दाखवत पैसे उकळण्याचे काम करतील. ही सत्यपरिस्थिती आहे. आपलं जगणं हे जगाच्या मतावर जगणं नसावं तर आपल्याला ज्या गोष्टींमध्ये स्वारस्य मिळेल त्या गोष्टींतूश ते खुलवत जावं.  परत एकदा भाऊ- बहिणीच्या नात्याला लागलेलं हे ग्रहण‌ किती वाईट आहे हे सांगणारे असे अनेक प्रसंग आहेत ज्यात या नात्याच्या नावाखाली आपली कामं केली जातात.  त्यामुळे रक्षाबंधन म्हणजे नेमकं काय तर मिञाची भाऊ म्हणून ओळख करुन देणे. हा आजकालच्या पिढीने लावलेला तर्क.  खुप खिन्न व्हायला होतं या साध्या गोष्टीआणि नातीही किती गुंतागुंतीची झालीये हे बघून. बहिण भावाचं नातं हे कळायला सांगायची गरज नसते. ते समोरच्याला आपोआपच समजचं इतका जिव्हाळा त्यात असतो. हे नातं कॉलेजमध्ये सापडायला तेवढं अवघड असतं पण सापडायला भाग्य लागतं. रक्षाबंधन म्हणजे लहानपणी वेण्या ओढणाऱ्या भावाची तितक्याच प्रेमानं काळजी घेणारी बहिण...
रक्षाबंधन म्हणजे कितीही भांडलो तरी आपल्या बहिणीला काही बोलणाऱ्यावर चिडून जाणारा भाऊ...
रक्षाबंधन म्हणजे एकमेकांच्या सोबतीने वाटून खाल्लेला खाऊ...
रक्षाबंधन म्हणजे बहिण जरी मोठी असली तरी तिच्यापेक्षा मोठं होऊन बापासारखी काळजी घेणारा भाऊ...
कोणी असो वा नसो एक आधार असतो की जरी बालपणाचे हट्ट संपलेले, जरी आता मोठ्यांचे शहाणपण आले, जरी आता बोलणे कमी झाले तरी त्याचा खांदा अजूनही शाबूत आहे माझ्यासाठी, कठीणसमयी तोच येणार‌ धावत मला तारण्यासाठी. 
हेच ते नातं कधी अबोल कधी अव्यक्त , कधी बोलकं तर‌ कधी स्तब्ध पण कधीच होत नसतं ते परकं... संरक्षणाच्या भिंतीचा‌ कायमचा तो पहारेकरी...
माझा भाऊ माझ्या सुखदुःखाचा ‌वाटेकरी.......!
एवढं सहज आणि सरळ हे नातं आहे. या भावा-बहिणीच्या नात्याची ही पोर्णिमा साजरी करतांना आपल्या भावाची जागा आणि भाऊ या नात्याची , शब्दाची जागा मजेतही दुसऱ्यासाठी वापरुन त्याचा अपमान‌ आपण करावा का?
 हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे........😊😊

                          ‌‌🖋️‌‌‌ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️
    

1 comment:

  1. Very appropriately elaborated the term "Bhau" which is used by today's generation. Keep your writing focusing the thing behind the thing

    ReplyDelete

बदलत्या वाचनसंस्कृतीकडे पाहतांना

       📚बदलत्या वाचनसंस्कृतीकडे पाहतांना📚 आधुनिक जगाच्या आधुनिक युगात व स्वातंञ्यापुर्वीच्या पारतंञ्यात परिस्थिती बदलाचे वार...