📚बदलत्या वाचनसंस्कृतीकडे पाहतांना📚
आधुनिक जगाच्या आधुनिक युगात व स्वातंञ्यापुर्वीच्या पारतंञ्यात परिस्थिती बदलाचे वारे वाहिले ते विचाराच्या युध्दनौकेनी. एका शस्ञाच्या हल्ल्यात घातपात होऊन परिस्थिती चिघळते. माञ एक विचार पेरला त्यामुळे त्या विचारांच्या श्रृंखलेतून पारतंञ्यातला देश, स्वातंञ्याच्या उंबरठ्यावरुन आज आधुनिक युगात नांदतो आहे. ही जादू विचारांची, विचारसरणीची! याच विचारांचे युध्द लढायचे असेल तर पुस्तक हेच सर्वोत्तम शस्ञ ठरले आहे.
वाचन हे मानवी प्रकृतीला आतून बाहेरुन बदलण्याची ताकद बाळगते. हे सांकेतिक शस्ञ अनेक अंगांनी माणसाच्या आयुष्यात षडरसांची बाग खुलवते. कधी प्रेमाच्या डोहात गुलाबी हवेची झुळूक देते, कधी मायेच्या ओलाव्याने मनाला स्पर्शावते, कधी मैञीचा सप्तरंग उभारते, कधी नात्यांना खुणावते तर कधी-कधी बावरलेल्या आयुष्याला शब्दरचनेतून सावरते. या मनाच्या पारव्याला कल्पनाविलासाच्या आभासी जगाचीही ओळख ही पुस्तकच पटवून देतात तर यापलीकडे जावून समाजातील जाणिवांच्या जखमांनी निरुत्तरही हीच पुस्तकं करतात. हाच तो पुस्तकांचा विस्तीर्ण समुद्र न आटणाऱ्या ज्ञानकोषासारखा या जगाचे रंग, जगण्याचे खरे अंग आणि सत्यपरिस्थितीची जाण दाखवत माणूस म्हणून आपल्यावर संस्कार करत असतात. यावरुन पुस्तकांची परंपरा कशाप्रकारे लाभली आहे याचा अंदाज बांधता येतो.
सुरुवातीलाच उल्लेखल्याप्रमाणेच आधुनिक काळाच्या, आधुनिक युगात आजही वाचनसंस्कृती येऊन ठेपलेली आहे. बदलत्या वाचनसंस्कृतीकडे बघतांना अनेक गुंतलेले धागेदोरे आपल्या नजरेस टिपतात. विषय अगदी साधा आणि सरळ आहे, पण मी म्हणेल तरीही तो खोल आहे. मी आज खरं तर मला स्वत:ला लिहितं करतेय पुस्तके, मोबाईल आणि बदलती वाचनसंस्कृती या विषयावर.
मोबाईल ही आजच्या काळाची नितांत गरज झाली आहे. आपल्या जवळ मोबाईल नसला की, आपण अगदी कावरेबावरे होऊन जातो. म्हणजे बघा ना, आजकाल कुठेही जा लहान लेकरांनाही मोबाईलची एवढी सवय झाली आहे की, त्याच्याशिवाय ते साधा घास देखील घेत नाही. 'एवढुसा जीव' पण मोबाईलचं तञंज्ञान अगदी सहज हाताळतो. मोबाईलच्या उगवत्या काळात ते खुप अप्रुप वाटायचे पण ते आता अगदी सामान्य झाले आहेत. प्रत्येक गोष्टींवर तंञज्ञानाकडे उपाय आहे. सर्वच क्षेञ व्यापणारं हे छोट्या मोबाईल मधील तंञज्ञान, साहित्य क्षेञालाही आपल्या दृष्टिक्षेपात गिळंकृत करण्याचा ठाव घेत आहे. आपल्या साहित्याला नवीन- नवीन युगात नवनवीन माध्यमं खुली झाली आहेत. पुस्तकं आता थेट मोबाईल अॅपच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळतात, प्रसिद्ध होतात. तसेच आपले विचार मांडण्यासाठी आता ब्लॉग, सोशल मिडिया यांचा वापर नवीन पिढीकडून वाढला आहे. आजच्या काळातील तरुण पिढी ही मराठी साहित्य आणि संस्कृती पासून दुर होत आहे असे आपण नेहमीच म्हणतो, पण तिच बाजू काही प्रमाणात जरी या मोबाईल ने भरुन काढली असली, तरी या गोष्टीमुळे लवकरच लिखित साहित्य आणि जुन्या लेखकांचे आणि प्रकाशकांचे वैभव असणारी पुस्तकीय कला आणि त्यांचा व्यवसाय हा काळाच्या पडद्याआड जाणार की काय? अशी जाणीव सतत मनाला सलत असते.
पुस्तके ही फक्त वाचाण्यापुरती नसतात, तर ती आयुष्याचा एक दृष्टीकोन आपल्याला देतात. उदास चेहऱ्यावर हसूही फुलवतात आणि एकटेपणात मिञताही निभावतात. जर आपल्या एका हातात पुस्तक ठेवले व तद्क्षणी मोबाईल मधील ई-बुक दिले तर निश्चितच आपला हात हा पुस्तकाच्या छापील प्रतीवरच जाईल. कारण पुस्तकाची छापील प्रत समोर घेऊन वाचण्यात जो आत्मिक आनंद मिळतो, तो मोबाईलवर वाचून कधीच आपल्याला मिळत नाही. हा जवळजवळ प्रत्येकाचाच अनुभव आहे. तद्वतच, बदलत्या वाचनशैलीशी म्हणजेच या मोबाईल वरील पुस्तकांशी जुळवून घेतांना माञ साहित्यक्षेत्र मोठे करणाऱ्या लेखक आणि एका लेखकाला त्याच्या लेखणीतून जगासमोर ओळख देणाऱ्या प्रकाशकाला आता कोणती वाट पकडावी? हा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न माञ चिन्हाने चांगलाच ग्रासतो आहे.
पुस्तक ही लेखकाची बौद्धिक मालमत्ता असते. त्या पुस्तकाला शब्दांकित करतांना तो एका प्रवासातून जात असतो. त्याच्या कष्टाळू रंजक प्रवासाचे चीज होते, जेव्हा लेखक आपल्या लेखणीतून जन्मलेल्या पुस्तकरुपी बाळाचे संगोपन करण्यासाठी तो ते वाचकांच्या हाती सोपवतो तेव्हा. परंतु आता मोबाईल वर पुस्तके अपलोड होत असल्यामुळे पुस्तकाचे सगळे हक्क हे सार्वजनिक असल्यासारखे तर झालेच पण या सर्वातून लेखकांना काय मिळाले? हा प्रश्न माञ मनात वादळ निर्माण करतो. प्रकाशकांचे माञ यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कित्येक जुनी पुस्तक प्रकाशनं बंद पडली तर काही माञ यातून सुवर्णमध्य काढून थोड्या प्रमाणात चालता आहेत.
मोबाईलच्या जमान्यात जरी सगळं साहित्य वाचण्यासाठी एका क्लिकवर हजर असलं तरी फुकट मिळाल्यामुळे त्याचे तितकेसे महत्व राहिले नाही. आधी सहज मिळत नव्हते तेव्हा ते वाचण्यासाठी आपली मागची पिढी तरसत असे. अगदी पुस्तकांसाठी उपाशी राहून ग्रंथपालाशी, तिथल्या चपराशी मामांशी मैञी करणे, वाटेल ते काम करुन शेवटी ते पुस्तक हाती यायचं. कधी तरी निराशाच पदरी पडायची. अशा अनेक पुस्तक मिळविण्याच्या या गुजगोष्टी माझ्या सरांच्या तोंडून ऐकतांना अक्षरशः अंगावर काटे येतात. यातून तुम्हाला तर पुस्तकांचं विश्व किती सहज उपलब्ध होत आहे व तुम्ही कशा पध्दतीने त्याचा कुशल वापर करायला हवा हे सांगतांना सरांचा त्यांच्या काळातील तो स्ट्रगल व आमच्यासाठीची तळमळ प्रकर्षाने मनचक्षुंना विस्फारते. खरंच प्रचंड मेहनत घेऊन ते वाचत होते पण इतका अनमोल ठेवा जेव्हा आपल्याला सहज मिळतो आहे तेव्हा आपल्याला त्याची किंमत नाही. मोबाईल आणि पुस्तकाचे नाते जरी जुळले असले तरी ते नाते माञ लेखकांच्या लेखणीला कुठेतरी थांबवत आहे अशी परिस्थिती सध्या दिसते.
साहित्य म्हणजेच आपली खरी संपत्ती आहे.आपले साहित्य एवढे अगाध आणि परिपुर्ण आहे की, त्यात जग बदलण्याची ताकद नक्कीच बळावते. परंतु तेच साहित्य क्षेञ आता मोबाईलच्या जमान्यात टिकाव धरु शकेल का? बरं आपणच आपल्याला एक प्रश्न विचारू या. आपल्याला वाचनाची खुप आवड आहे आणि आपण ठरवलं की, आपण आज मोबाईलमध्ये छान पुस्तक वाचुया. खरं सांगा, किती जण प्रमाणिकपणे ते पुस्तक वाचतात? वाचायला घेतलं तरी, आपण मध्येच सोशल मिडियावर एक फेरफटका मारून येतो. दोन पानंसुध्दा एकाग्रचित्ताने आपण वाचू शकत नाही. कारण पुस्तक म्हणजेच एकाग्रता आणि ती एकाग्रता मोबाईर स्क्रीनमुळे डोळ्यांवर येणाऱ्या प्रकाशाने भंगुनच जाते. हा एक आरोग्याशी संबंधित प्रश्न आलाच ना?
महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात साहित्य संमेलन पार पडले. दरवर्षीच्या तुलनेत संमेलनामध्ये पुस्तकांचे स्टॉल हे कमी बघावयास मिळतात. म्हणजे बघा साहित्याच्याच संमेलनात असे दृश्य दृष्टीस पडणे म्हणजे पुढे काही वर्षांनी साहित्य संमेलन साहित्य प्रदर्शनाशिवाय कसे पार पडणार यातच शंका वाटते. कुठेतरी याबाबतीतही विचार होणे गरजेचे आहे. नगण्य झालेली पुस्तक प्रदर्शने व दिवसागणिक कमी होत चाललेली पुस्तक विक्री यामुळे वितरकांचाही मोठा तोटा होत आहे. यावर खरंच विचार करण्याजोगी परिस्थिती आहे. यातून काहीतरी सुवर्णमध्य काढायलाच हवा. खरच ई-बुक, ऑडिओ बुक असे पर्याय हे छापील माध्यमातील पुस्तकांहून अधिक सोयीची आहेत का? काही बाबतीत असतीलही सोयीचे जसे की प्रवासात. पण तरीही मार्केटमध्ये नवीन गोष्टी आल्यावर जुन्या विश्वासू गोष्टींची किंमत कमी नाही ना होत. तसेच पुस्तकांचे आहे बघा. एका सोप्या पण थोड्या मनोरंजक पध्दतीने सांगायेच झाले तर गेम हा मोबाईलमधेच खेळावा आणि पुस्तक हे समोर ठेवून शांत अशा वातावरणातच वाचावे.
तंञज्ञान नक्कीच पुढे जावे, पण ज्या गोष्टीच मुळात अजरामर आहेत त्यांना न छेडता प्रगती करत रहावी. १०० पैकी ९५% वाचक हे अजूनही पुस्तक खरेदी करुनच वाचायला प्राधान्य देतात. ज्यांना मोबाईल वापरुन आपले पुस्तक प्रकाशित करण्याचे मार्ग माहित असतील त्यांनी ते काळजीपुर्वक करावे आणि वाचकांनीही तंञज्ञानाचा दुरुपयोग करून कुठलेही पुस्तक वाचू नये. कारण त्यामागे त्या लेखकाची मेहनत असते. लेखकाच्या परवानगी शिवाय कुठल्याही पुस्तकाचे Pdf पुढे पाठवणे, त्यांच्या लिखाणाचा आपल्या नावाने प्रसार करणे कायद्याने गुन्हा आहे. यालाच Copyright Act म्हणतात. योग्य त्या मोबदल्यात खरेदी करुन आँनलाईन पुस्तके वाचावीत ही कळकळीची विनंती.
तरीही या ऑनलाईन जमान्यातही रमणीय एकांतात पुस्तक वाचण्याची पारंपरिक पध्दत अशीच चालू रहायला हवी. आपल्या पुढच्या पिढीवरही पुस्तकातून संस्कार व्हावेत. जर पुस्तकी ज्ञान संपुष्टात आले तर साहित्य क्षेञाला उतरती कळा लागेल. म्हणुनच जे आपलं आहे ते आपणच जपलं पाहिजे मग ती एखादी व्यक्ती असो वा तिचं मन असो का आपलं अलौकिक ज्ञानभांडार असणारे आपले साहित्यक्षेञ.....!
बदलत्या वाचनसंस्कृतीकडे बघतांना अनेक अंगांनी आपल्यासमोर साहित्यक्षेञाची भिंत उभी राहते. वाचनसंस्कृतीला फुटलेले नवे आयाम, समीक्षेच्या आरशातून पार झालेले चपखल लिखाण यामुळे लेखनशैलीत पारदर्शकता आली. जुन्या लेखकांची लेखनशैली आणि नवोदित लेखकांची लेखनशैली यात बऱ्याच अंशी फरक जाणवतो. कारण, कुठल्याही लेखकाच्या साहित्यनिर्मितीवर स्थळ, काळ आणि परिस्थितीचे पडसाद उमटत असतात. मुळात कवी आणि लेखकांच्या सभोवतालच्या अनुभवविश्वातूनच त्यांच्या लेखणीतून शब्द उमटत असतात व पुढे तेच शब्द पुस्तक, कादंबरी, ग्रंथ, कवितासंग्रह यांचे नामरुप धारण करतात. समीक्षा ही लेखकाच्या लेखनकृतीवर संस्कार घडवते हेच खरे.
म्हणून माझ्या मते, आजच्या बदलत्या वाचनसंस्कृतीचे एक रुपडे म्हणजेच समीक्षा. काळाच्या ओघात पुस्तके प्रत्यक्षात वाचण्यापेक्षा पुस्तके वाचलेली दाखवण्याचा नुसताच बडेजाव मांडला जातो. पुर्वी आजी-आजोबांच्या गोष्टींपासून पुस्तके वाचण्याची आवड निर्माण व्हायची. आता माञ आजी-आजोबांच्या गोष्टींच लोप पावत चालल्या आहे. एकीकडे पुस्तकांच्या गडद विश्वात तल्लीन झालेली पुस्तकप्रेमी तरुणाई नजरेस पडते तर दुसरीकडे पुस्तकांपासून दूर पुस्तकांच्या विश्वाबाहेर जगणारी तरुणाईही आपल्याला दिसते. अनेक जण म्हणतात, पुस्तकी जगण्यापेक्षा बाहेर प्रत्यक्षात जगून बघा. परंतु बाहेरच्या जगण्याचे विदारक वास्तव म्हणजेच तर पुस्तक, भांबवलेल्या परिस्थितीत जगण्याची जागवलेली नवी उमेद म्हणजेच तर पुस्तक. मुळात पुस्तकांच्या सोबतीत जगणाऱ्या माणसाला आनंदी आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली सापडते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
शेवटी काय, तर पुस्तके ही निरागस आणि सरळ असतात. त्यांच्यात कितीही गुंतत गेले तरी ते कधीही चुकीचा मार्ग दाखवत नाही व आपण निराशेच्या गर्तेत कधीत चाचपडत नाही. नव्या युगानुसार वाचनसंस्कृतीतही अनेक टप्पे येतील माञ पुस्तकांची परंपरा अडगळीत सापडली, तरी देखील वाचनवेड्यांचा पुस्तकी सत्याग्रह कधीही पुस्तकांचे जग बंदिस्त होऊ देणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त "पुस्तक संवर्धन" आणि "वाचन संवर्धन" या दोन नव्या दृष्टीपटलातून बघण्याची गरज आहे. ही दृष्टीपटले आपणही आपल्या डोळ्यात सामावून घेऊयात व वाचसंंस्कृतीच्या रथावर स्वार होऊन अविरतपणे पुस्तकांच्या ज्ञानाने समृध्द होऊयात. जागतिक पुस्तक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतांना हे दोन विचार मांडते. तुम्हीही विचार करा!
🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️
